कर्मचाऱ्यांप्रती आदर भाव ठेवणे गरजेचे : ना. गुलाबराव पाटील (व्हिडिओ)

g s society

जळगाव , प्रतिनिधी ।  संस्थेच्या वाटचालीत कर्मचाऱ्यांची भूमिका मोठी असते. संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांप्रती आदराची भावना ठेवणे आवश्यक आहे. संस्थेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणी गट-तटाचे राजकारण करु नये, असे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ते लोकसहकार गटाच्या वतीने आयोजित ग. स. सोसायटीतील सेवानिवृत्त व उत्कृष्ठ सेवा वाजविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हा बँक संचालक संजय पवार, डॉ. सुरेश पाटील, ग. स. चे अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर यासह इतर संचालक उपस्थित होते. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, अनेक पतसंस्थाचा कारभार सुरळीत सुरु असतांना त्या बंद पडत असल्याच्या काही लोकांकडून अफवा पसरविण्यात येतात.  अफवा पसरल्यानंतर नागरिक लगेच पैसे काढण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे संस्था बंद पडते. राज्यासह जिल्हाभरातील पतसंस्था या अशाच प्रकारे लोकांनी पसरविलेल्या निव्वळ अफवेने बुडाल्या आहेत. खासदारकी पेक्षाही आता ग. स. ची निवडणूक अवघड झाली असल्याचे मत व्यक्त केले.  या संस्थेत वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार असून त्यांच्यात वेगवेगळे रंग आहेत. या वेगवेगळ्या रंगाच्या लोकांचे मनं जुळवून, संचालकपदी निवडूंन येणं अवघड असल्याचे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले. . या सत्कार कार्यक्रमांत ना. गुलाबराव पाटील यांनी आता दोन महिन्यांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे माझ्याकडेही लक्ष द्या. असे भावनिक आवाहनही केले.

Protected Content