मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर चोवीस तासात भाजपात गेलेले कार्यकर्त्यांनी सोमवारी ११ सप्टेंबर रोजी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे पहावयास मिळाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथिल मुस्लिम समाजातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी काल रविवारी १० सप्टेंबर रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके आणि अशोक कांडेलकर यांच्याहस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पण यातील काही कार्यकर्त्यांचा प्रवेश हा औट घटकेचा ठरला. आज सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सबदर बेग, मेहमूद मिर्झा, नजिर शा रसुल शा यांनी लोकनियुक्त सरपंच डॉ. बी. सी. महाजन यांच्याहस्ते परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी डॉ बी.सी. महाजन यांनी त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा रुमाल टाकून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसी केली.
यावेळी सबदर मिर्झा म्हणाले, काल झालेल्या प्रवेश सोहळ्या संदर्भात मला कोणतीही माहिती नव्हती, आम्हाला तिथे बोलवण्यात येऊन माझ्या गळ्यात भाजपचा रुमाल टाकण्यात आला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहू, इतर कार्यकर्ते सुध्दा राष्ट्रवादी पक्षात परत येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला न्याय देणारा पक्ष असुन आमचा लोकनेते आ एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे सबदर मिर्झा यांनी सांगितले. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांची दिशाभूल करुन नेत्यांना खुश करण्यासाठी पक्ष प्रवेश करून घेण्याची काही नेत्यांची खेळी उलटल्याची कुऱ्हा परीसरात चांगलीच चर्चा रंगली आहे