बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागला असून यात राष्ट्रवादी प्रणीत पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे.
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यासह भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसराचा समावेश आहे. यामुळे तीन तालुक्यांची एकमेव बाजार समिती म्हणून या मार्केट कमिटीचा लौकीक आहे. अर्थात, याचमुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून बाजार समिती ही भाजपकडे होती. आता ते राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल उभे केले. या पॅनलला पहिल्यांदा महाविकास आघाडी पॅनले संबोधण्यात आले असले तरी कॉंग्रेसच्या उमेदवारांना यात स्थान मिळाले नाही. याचमुळे अर्ज माघारीच्या वेळेस कॉंग्रेसचे नेते विरेंद्र पाटील आणि डॉ. जगदीश पाटील यांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर जोरदार टिका केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पॅनलला शिवसेना व भाजपच्या पॅनलने तगडे आव्हान उभे केले होते. या माध्यमातून आमदार एकनाथराव खडसे विरूध्द आमदार चंद्रकांत पाटील असा सामना देखील रंगला होता. निवडणुकीच्या काळात दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. या अनुषंगाने निवडणूक चुरशीची झाली.
आज सकाळी दहा वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. यात दोन्ही पॅनलमध्ये चुरस निर्माण होईल अशी अपेक्षा होती. तथापि, असे झाले नाही. येथे राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला. तर महायुतीच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत नाथाभाऊंच्या सोबतीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व नेत्या रोहिणी खडसे तसेच सर्व सहकार्यांनी तळमळीने काम केले. नाथाभाऊंच्या सहकारातील आधीच असलेल्या ताकदीला राष्ट्रवादीची जोड मिळाल्याने येथे राष्ट्रवादीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी प्रणीत पॅनलचा विजय दृष्टीपथात आल्याबरोबर समर्थकांनी जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.