मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सांगली, कोल्हापूरसह अन्य भागांमध्ये महापुराची निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राज्यशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात याबाबतचे सविस्तर मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच पुरग्रस्तांच्या पुनर्सवनाबाबत २५ वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने नेत्या खा. सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार हेमंत टकले, आमदार विद्याताई चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षा आदिती तटकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून किमान ४ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत प्राप्त करुन घ्यावी. तसेच, सर्व पंचनामे व नुकसानीची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर एनडीआरएफच्या मदतीचा प्रस्ताव केंद सरकारला सादर करावा. राज्यातील सर्व पूरग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकर्यांचे जून २०१९ अखेरपर्यंतचे सर्व थकित कर्ज, व्याजासह सरसकट माफ करावे. या शेतकर्यांना नवीन पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन द्यावे. पाण्याखाली असणार्या सर्व पिकांना तसेच ऊसाला व आंबा, काजूसारख्या सर्व फळपिकांना हेक्टरी १ लाख रुपये, भाताला ५० हजार रुपये आणि नाचणीसाठी ४० हजार रुपये अनुदान द्यावे. शेतपिकांच्या नुकसानीसाठी पूरग्रस्त भागातील शेतकर्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करावी. शेतजमिनींच्या झालेल्या नुकसानीपोटी, खरवडलेल्या जमिनींसाठी, शेतीतील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी. पूरग्रस्त भागातील घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापनांच्या इमारती व व्यवसायांना झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने रोख स्वरुपात द्यावी आदींसह अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.