धनाजीनाना महाविद्यालयात डॉ. रंगनाथन जयंती साजरी

faijpur news

फैजपूर, प्रतिनिधी | येथील धनाजीनाना महाविद्यालयातील ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.रंगनाथन यांची जयंती काल (दि.१२) थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.बी. तायडे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाचे महत्त्व पटवून देताना म्हटले की, वाचाल तर वाचाल !

 

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात ग्रंथपाल इरबा गायकवाड यांनी सदर कार्यक्रम आयोजनासंदर्भातील भूमिका विशद केली. उपप्राचार्य तायडे यांनी ग्रंथालय व ग्रंथ यांचे महत्त्व पटवून देताना ग्रंथ वाचनामुळे वाचकाचे मन आणि बुद्धीचा विकास होऊन त्याचे विचार परिपक्व होतात, तसेच वाचन करणे हा एक डोळ्यांचा व्यायामही आहे. वाचनामुळे वाचकाचे व्यक्तिमत्व संपन्न होते, त्याचे विचार परिपक्व होतात म्हणून वाचकांनी भरपूर वाचावे, असा मोलाचा सल्ला दिला. त्याचबरोबर डॉ. रंगनाथन व थोर वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या जीवनकार्याचा परिचय उपस्थित श्रोत्यांना करून दिला.

यानिमित्ताने ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने घेतला. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक राजेंद्र राजपूत व डॉ.आय.पी. ठाकूर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल गायकवाड यांनी केले तर आभार व्ही.एस. सरोदे यांनी मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयातील कर्मचारी सहर्ष चौधरी, फरीद तडवी, सौ. यमुना नेमाडे, श्रीमती यामिनी पाटील व सुरेखा सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content