मुंबई प्रतिनिधी । उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा तर काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष असेल असा फॉर्म्युला ठरविण्यात आल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
महाविकास आघाडीची आज सायंकाळी प्रदीर्घ बैठक झाली. यात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी तब्बल चार तासांपर्यंत बैठक घेऊन सत्ता वाटपाचे सूत्र ठरविले. ही बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी यातील निर्णयांबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, या बैठकीत उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राहणार आहे. काँग्रेसला विधानसभाध्यक्षपद मिळणार असून विधानसभेचे उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यात उध्दव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक पक्षाचे दोन मंत्री शपथ घेतील. तर ३ डिसेंबरनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.