Home Cities अमळनेर ‘नवरंग’मधून अर्थपूर्ण जीवनाचा संदेश ; डॉ. आशुतोष रारावीकर  

‘नवरंग’मधून अर्थपूर्ण जीवनाचा संदेश ; डॉ. आशुतोष रारावीकर  

0
28

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नवरात्रीच्या नवरंगांमधून सकारात्मकता, समृद्धी, सामर्थ्य, समर्पण, स्नेह, समतोल, संयम, संस्कार आणि सेवा या अर्थपूर्ण जीवनाच्या नऊ मौलिक मूल्यांचा संदेश मिळतो. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य विचारांची दिशा, सद्गुणांची जोपासना आणि माणसांशी जपलेले नाते यांमधून यशस्वी व समाधानकारक जीवन घडते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, साहित्यलेखक आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. आशुतोष रारावीकर यांनी केले.

मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर यांच्या वतीने ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित शारदीय व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ‘नवरंग : अर्थपूर्ण जीवनाचे’ या विषयावर डॉ. रारावीकर यांनी पहिले पुष्प गुंफले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील विचारप्रवर्तक व्याख्यानाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट करताना डॉ. रारावीकर यांनी नवरात्रीच्या नऊ रंगांचा अर्थपूर्ण जीवनातील विविध मूल्यांशी संबंध जोडला. समृद्धी, आत्मशक्ती आणि निरामयता यांच्या माध्यमातून यशस्वितेचा मार्ग खुला होतो, तर समर्थ तन आणि समर्थ मन हेच खऱ्या अर्थाने जीवनाचे धन आहे, असे त्यांनी सांगितले. अनंत आशा आणि योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र असून, समतोल, समाधान आणि संस्कार यांमधून जीवनाला योग्य आकार मिळतो, असेही त्यांनी अधोरेखित केले.

आपल्या व्याख्यानात त्यांनी विविध काव्यपंक्ती, प्रेरणादायी कथा, रंजक किस्से आणि उद्बोधक वाक्यांच्या माध्यमातून जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. विचारांची योग्य दिशा आयुष्याचा प्रवाह सुखकर बनवते, असे सांगत त्यांनी ज्ञानाचे महत्त्व विशद केले. चार पुरुषार्थ, यशस्वी जीवनाची सूत्रे, वेळेचा योग्य उपयोग, समृद्धी आणि सामर्थ्य यांचा कौशल्यपूर्ण विनियोग, तसेच साहित्य आणि संगीताचे जीवनातील स्थान यांचे त्यांनी सविस्तर विवेचन केले.

जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ संपत्ती पुरेशी नसून सद्गुणांचा अवलंब, दातृत्वाची भावना, उपासना आणि माणसे जोडण्याची वृत्तीही महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणाऱ्या छोट्या-छोट्या यशाचाही उत्सव साजरा केला पाहिजे. प्रत्येक यशातून प्रेरणा घेत पुढे जाण्याची वृत्ती माणसाला अधिक सक्षम बनवते, असे त्यांनी नमूद केले. जीवन ही केवळ यश मिळवण्याची नव्हे, तर नाती जोडण्याची यात्रा आहे, अशी महत्त्वपूर्ण मांडणी डॉ. रारावीकर यांनी केली. व्यवसायात आपल्या कामाशी, सामाजिक जीवनात माणसांशी आणि उपासनेत परमेश्वराशी जोडले जाणे, यातून जीवनाचा खरा अर्थ उलगडतो, असे ते म्हणाले. समतोल, संयम, समाधान, संस्कार आणि सेवा ही सकारात्मक जीवनाची पंचसूत्री त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.

व्याख्यानाच्या प्रारंभी डॉ. रारावीकर यांनी मराठी वाङ्मय मंडळाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले. खानदेशच्या समृद्ध संस्कृतीचा गौरव करताना त्यांनी अहिराणी भाषेतही काही वाक्ये सादर केली. त्यांच्या या स्थानिक भाषेतील संवादामुळे उपस्थितांशी आपलेपणाचे नाते निर्माण झाले आणि त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षेत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमा देसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने डॉ. अविनाश जोशी, डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि प्रा. डॉ. यू. जी. देशपांडे हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्याम पवार आणि भैय्यासाहेब मगर सर यांनी केले.


Protected Content

Play sound