मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आज समाप्त झाला असून यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाबाबत चर्चा सुरू असतांना आज यावर शिक्कामोर्तब झाले असून यामुळे शरद पवार यांना मोठा हादरा बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबतच तृणमूल कॉंग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना १९९८ साली झाली होती. तेव्हापासून सलग १५ वर्ष हा पक्ष राज्यात सत्तेत होता. तसेच या पक्षाने देशाच्या राजकारणातही ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकेकाळी देशाचे केंद्रीय कृषीमंत्रीदेखील होते. असं असताना निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत घेतलेल्या निर्णयाचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आगामी काळातील राजकारण आणि निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी गेल्या अनेक दिवसांपासून भाजपशी अनुकुल भूमिका घेतल्यानंतरही राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढण्यात आल्याची बाब देखील लक्षणीय मानली जात आहे.