जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय ज्ञानपरंपरा फार मोठी असून आपल्या पूर्वजांचे ज्ञान सध्याच्या काळात, सध्याचे संदर्भ घेऊन कसे वापरता येतील याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग प्रयत्नशील असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे ही परंपरा समृद्ध होईल असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ.मनीष जोशी यांनी व्यक्त केला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवार १७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी नीती वरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रभारी अधिष्ठाता डॉ.जगदीश पाटील, कला व मानव्य प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा राम भावसार, डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. तुषार रायसिंग उपस्थित होते.
डॉ.मनीष जोशी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर आजही रोमांच उभे राहतात. छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात काही नवे मोड्यूल्स उभे राहायला हवेत. भारतातील ज्ञानपरंपरा खूप मोठी आहे. ती संदर्भ म्हणून आजच्या काळात कशी वापरता येईल यादृष्टीने अनुदान आयोगाने देशभर बरेच कार्यक्रम घेतले. त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. भाषा, प्रांत, धर्म या पलीकडे ही ज्ञानपरंपरा आहे. त्या दृष्टीने आगामी काळात काही कंटेंट निर्मितीवर भर देण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा प्रयत्न आहे. भारतीय भाषांमध्ये पुस्तके काढली जाणार आहेत असे सांगून डॉ.जोशी म्हणाले की, विद्यापीठ अनुदान आयोगात मी राज्य विद्यापीठांचा ॲम्बेसेडर म्हणून काम करतोय. राज्य विद्यापीठांमधील गुणवत्तेला योग्य संधी मिळायला हवी असा माझा आग्रह आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध आयामांची ओळख या चर्चासत्रात झाल्याचे नमूद करून ध्येय, शिस्त आणि जिंकण्याची मानसिकता हे छत्रपती शिवरायांचे गुण तरुण पिढीने अंगी बाळगण्याचे आवाहन केले. प्रारंभी प्रा.राम भावसार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.डॉ.जगदीश पाटील यांनी चर्चासत्राचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय पालवे व प्रा.लक्ष्मी अंभोरेकर यांनी केले. सचिव डॉ.तुषार रायसिंग यांनी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यापीठाने घेतलेल्या या राष्ट्रीय चर्चासत्राला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. २७६ जणांनी नोंदणी केली. १५० पेक्षा अधिक शोधनिबंध प्राप्त झाले. आयसीएसएसआर नवी दिल्ली या संस्थेने चर्चासत्रासाठी सहाय्य केले.