Home Cities जळगाव ‘पढो और बढो’चा संदेश देत ए. टी. झांबरे विद्यालयात राष्ट्रीय वाचन प्रेरणा...

‘पढो और बढो’चा संदेश देत ए. टी. झांबरे विद्यालयात राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिन साजरा

0
107

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव आणि रेडिओ मनभावन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानसंपदा वाढविणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे तसेच चिकित्सक विचारसरणी आणि वाचन संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. गोविंद देशपांडे, कान्ह ललित कला केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, रेडिओ मनभावनचे संचालक अमोल देशमुख तसेच रेडिओ मनभावनच्या आर. जे. शुभांगी बडगुजर यांची उपस्थिती लाभली. पी. एन. पणीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वाचन दिवसाचे महत्त्व यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले. केरळमध्ये ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रसार करणारे पी. एन. पणीकर यांनी दिलेला “पढो और बढो” हा संदेश आजच्या काळातही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजनाने करण्यात आली.

यावेळी शाळेला एन्सायक्लोपीडियाचे सर्व भाग भेट देणारे ॲड. गोविंद देशपांडे तसेच रेडिओ मनभावनचे संचालक अमोल देशमुख, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आणि आर. जे. शुभांगी बडगुजर यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक अमोल देशमुख यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात पुस्तकांचे महत्त्व, वाचनामुळे होणारा व्यक्तिमत्त्व विकास आणि ज्ञानवृद्धी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पुस्तक अभिवाचन. विद्यार्थ्यांनी ‘चिंगी’ या पुस्तकाचे प्रभावी अभिवाचन सादर केले. स्पृहा साळुंके, वैष्णवी पाटील, अनुश्री चौधरी, सुमित पाटील, शाश्वत कुलकर्णी आणि कौस्तुभ खैरनार या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांमधील निवडक उतारे आत्मविश्वासाने सादर केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या वाचन, आकलन आणि अभिव्यक्ती कौशल्यांना चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नियमित वाचनाची सवय ही यशस्वी जीवनाचा पाया असल्याचे सांगितले. पुस्तकांच्या सहवासातून ज्ञान, संस्कार, मूल्ये आणि व्यापक दृष्टिकोन विकसित होतो. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कायम असून प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज काही वेळ वाचनासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास, भाषाशैली, विचारक्षमता आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होते, असेही मान्यवरांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचनाची सवय लावून घ्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

सूत्रसंचालन शिक्षण सेविका रत्नमाला शिंदे यांनी केले तर आभार निर्मल चतुर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा लोहार आणि ग्रंथपाल रोशनी कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी प्रेम, वाचनाची गोडी आणि ज्ञानार्जनाची प्रेरणा निर्माण झाली. वाचन संस्कृती मजबूत करण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

 


Protected Content

Play sound