नवी दिल्ली । कोरोना रूग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यानंतर देशव्यापी लॉकडाऊनची शक्यता असल्याची माहिती समोर आली असली तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला साफ फेटाळून लावले आहे.
देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतांना दिसून येत आहे. यामुळे केंद्र सरकार देशव्यापी लॉकडाऊनच्या विचारात असल्याचा दावा एका इंग्रजी संकेतस्थळाने केला होता. यावरून प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियातूनही मोठे चर्वण करण्यात येत आहे. तथापि, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतहा दावा साफ फेटाळून लावला आहे. देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार घाईघाईने घेणार नाही. तुर्तास घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर अवलंबून असेल. राज्य यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असं शहांनी म्हटलं. ‘भारतच नव्हे, अन्य देशांमध्येही कोरोनाची दुसरी लाट जास्त भीषण ठरली. दुसऱ्या लाटेनं जगभरात प्रचंड मोठी हानी झाली. पण इतर देशांची लोकसंख्या आणि तिथे झालेलं नुकसान पाहता भारतानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात चांगली कामगिरी केली आहे,’ असं गृहमंत्री म्हणाले. ते ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
अमित शाह यांनी म्हटले की, रुग्णवाढीचा संबंध निवडणुकांशी जोडणे योग्य नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्या राज्यांत जास्त रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? मग तिकडे 60 हजार आणि पश्चिम बंगालमध्ये 4 हजार रुग्ण आहेत. यावर तुम्ही काय म्हणाल, असा सवाल अमित शाह यांनी केला.