जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जैन हिल्स येथील अनुभूती मंडपम येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चुरस वाढताना दिसत आहे. या स्पर्धेत ३९२ मुले आणि १७७ मुली सहभागी असून, त्यापैकी ४०० पेक्षा जास्त खेळाडू मानांकित आहेत. स्पर्धेच्या चौथ्या दिवसापर्यंत आणि सहाव्या फेरीपर्यंत मानांकित खेळाडूंचे वर्चस्व कायम राखण्यासाठी त्यांची कस लागत आहे, तर काही नवख्या खेळाडूंनी आपल्या चालींनी त्यांना जेरीस आणले आहे. पहिल्या ४० खेळाडूंमध्ये ४ गुणांसह वर्चस्वासाठी तीव्र स्पर्धा बघायला मिळत आहे.
मुलांच्या गटात धक्कादायक निकाल:
मुलांच्या गटात पाचव्या फेरीत १० खेळाडू आघाडीवर होते. पहिल्या पटावर झालेल्या एका धक्कादायक लढतीत महाराष्ट्राचा अग्रमानांकित आरेन मेहता याला दिल्लीच्या अद्वित अग्रवालने पराभूत केले. दुसऱ्या पटावर अविरात चौहानने महाराष्ट्राच्या क्षितीज प्रसादला चेक मेट करत विजय मिळवला, तर तिसऱ्या पटावर राजस्थानच्या रिशान जैनला दिल्लीच्या अरिहत कपिलने नमवले. कर्नाटकच्या वेंकटानागा कार्तिक याला पांडुचेरीच्या राहुल रामकृष्णनने हरवले, तर बिहारच्या देवांश केसरीला पश्चिम बंगालच्या नरेंद्र अग्रवालने आपल्या कौशल्याने धक्का दिला.

मुलींमध्ये समिता पुलगावन आघाडीवर:
मुलींच्या गटात सहाव्या फेरीपर्यंत चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. पाचव्या फेरीतील पहिल्या पटावर केरळची मानांकित खेळाडू दिनी बेजेस आणि त्रिपुरा येथील आराध्या दास यांच्यातील सामना अटीतटीचा होऊन बरोबरीत सुटला. दुसऱ्या पटावर तेलंगणाची समिता पुलगावन हिने तामिळनाडूची पूजाश्री हिला नमवून आघाडी घेतली. तिसऱ्या पटावर तेलंगणाची अल्ला हिमा हिला झारखंडची दिशिता डे ने नमवून आपले वर्चस्व सिद्ध केले. सहाव्या फेरीअखेर समिता पुलगावन मुलींमध्ये पाच गुणांसह आघाडीवर होती.
पंच आणि मार्गदर्शन:
कोलकात्याचे मुख्य पंच देवाशीष बरुआ यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत आहे. त्यांना गुजराथचे प्रशांत रावल, जळगावचे प्रवीण ठाकरे, नागपूरचे स्वप्नील बनसोड, नाशिकचे मंगेश गंभीरे, मुंबईचे संदेश नागरनाईक, साताराचे शांतुल तापासे, पुणे येथील जुईली कुलकर्णी, धुळे येथील योगेश गावंडे, नथ्थू सोमंवशी, पाचोरा येथील अभिषेक जाधव, छत्रपती संभाजीनगर येथील अमरेश जोशी, नागपूर येथील शिशीर इंदुरकर, अहिल्यानगर येथील यशवंत बापट, जळगावचे आकाश धनगर, भरत आमले, बिहार येथील मीना यादव आणि धाराशिव येथील महादेव बोरे हे पंच म्हणून सहकार्य करत आहेत.
स्पर्धेच्या चौथ्या दिवशीच्या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सीईओ अंबिका अथांग जैन यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी सकारात्मक खेळ करण्याचे आवाहन करत, विजय-पराभवाचा विचार न करता आपले १०० टक्के योगदान देण्यास सांगितले. तसेच, खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याचे आणि महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. जैन हिल्स येथील गांधी तीर्थाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. दुसऱ्या सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी जैन परिवारातील सदस्या शोभना जैन, कॅंडिडेटमास्टर विनोद भागवत-नाशिक, देवाशीस बारूआ, स्वप्नील बनसोड आणि रवींद्र धर्माधिकारी उपस्थित होते. यावेळी विनोद भागवत यांनी बुद्धिबळ खेळाविषयी मार्गदर्शन केले.



