मुंबई (वृत्तसंस्था) ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्राकडून २०२० मध्ये मंगळावर अंतराळयान पाठवण्यात येणार आहे. नासाच्या या मोहिमेची जय्यत तयारी सुरू आहे. नासाच्या मंगळ मोहिमेसाठी एका विशेष अंतराळयानाची निर्मिती करण्यात येत आहे. या यान निर्मितीची प्रक्रिया सर्वांना पाहण्याची संधी नासाने उपलब्ध करून दिली असून वेबकॅमद्वारे जिज्ञासूंना ही यान निर्मिती पाहता येणार आहे. तर, मंगळ मोहिमेकरीता तयार करण्यात आलेल्या हेलिकॉप्टरला लवकर अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
मंगळावरील मोहिमेत या हेलिकॉप्टरची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या मोहिमेत मंगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंगळ मोहिमेत या हेलिकॉप्टरची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे अनेक चाचण्या घेण्यात येत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, साधारण सात वर्षांपूर्वी ‘नासा’कडून ‘मार्स २०२०’ मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. यासाठी एका खास अंतराळयानाची निर्मिती नासाने सुरू केली आहे. ‘नासा’ बाहेरील संशोधक, अभ्यासक, नागरिकांना ‘नासा’तील अभियंते आणि तंत्रज्ञ यानाची निर्मिती आणि चाचणी कशी करतात, याची माहिती मिळावी यासाठी प्रयोगशाळेत वेबकॅम लावण्यात आले आहेत. या कॅमेरातून प्रयोगशाळेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये प्रयोगशाळेच्या सोशल मिडीया टिमसोबत संवाद साधता येणार आहे.