नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिंडोरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ हे महायुतीचे उमेदवार राहणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. नाशिक दौऱ्यावर आलेल्या तटकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी दिंडोरी आणि निफाड येथे मेळावे पार पडले. यावेळी तटकरे यांनी ही घोषणा केली. दिंडोरीतील मेळाव्यात उपसभापती नरहरी झिरवळ यांनी आपल्याविषयी प्रसारमाध्यमातून नाहक वावड्या उठविल्या जात असल्याचे नमूद केले.
काही दिवसांपूर्वी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाला होता. दिंडोरी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तो आग्रही आहे. आपल्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात असला तरी आपण सदैव अजित पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचे उपसभापती झिरवळ यांनी स्पष्ट केले. सामान्य आदिवासी कार्यकर्त्याला दादांनी विधानसभेचे उपसभापती बनविले. सरकार बदलले, पण आपले पद कायम राहिले. त्यांनी कोट्यवधीचा निधी विकास कामांसाठी आपल्या मतदारसंघात दिल्याचे झिरवळ यांनी सांगितले.