नंदुरबार प्रतिनिधी । मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळून लावत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रूग्णसेवेसाठीच आपण रेमडेसिवीरचे वाटप केले असून यासाठीच्या परवानगीसह आवश्यक ती कागदपत्रे आपल्याकडे असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांनी अमळनेरचे माजी आमदार तथा गत विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी परवाना नसतांना रेमडेसिवीरचा साठा करून अवैध पध्दतीत वाटल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा साफ इन्कार केला.
याप्रसंगी शिरीष चौधरी म्हणाले की, नंदुरबारसह खान्देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात हाहाकार असून रेमडेसिवीर इंजेक्शनचाही काळाबाजार सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात या इंजेक्शनचा पुरवठा व्हावा म्हणून आम्ही हिरा ग्रुपच्या माध्यमातून याची कंपनीकडून खरेदी केली. याची बिले आणि इंजेक्शनच्या खरेदीच्या परवानगीची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. आम्ही आजवर सुमारे साडे सात हजार लोकांना अतिशय माफक दरात ही इंजेक्शन्स उपलब्ध करून दिलेली आहे. आम्ही एक लाख इंजेक्शन्सचे वाटप करणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणी विरोधक फक्त विरोधासाठीचे राजकारण करत असल्याबद्दल शिरीष चौधरी यांनी टीका केली. ते म्हणाले की, जनतेची मदत करणे हा जर गुन्हा असेल तर आम्ही अनेक वेळेस हा गुन्हा करण्यासाठी तयार आहोत. सत्ताधार्यांनी राजकारण करणे सोडून जनसेवा करावी असा टोला देखील त्यांनी मारला.
ना.नवाब मलिक यांनी कार्यालयात बसून आरोप करण्यापेक्षा नंदुरबारला येवून मृत्यूचे तांडव पाहावे.स्मशानात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.अशा परिस्थितीत रूग्णांसाठी प्रामाणिक सेवा केली तर काय गुन्हा केला,असे चौधरी म्हणाले. राजकारण करण्यापेक्षा रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला.