‘या’ राज्यांमधून आलेल्या होम क्वॉरंटाईन रहावे लागणार !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढला असतांना आता जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन नोटिफिकेशनच्या माध्यमातून सहा राज्यांमधून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी करून त्यांना सक्तीने १४ दिवसांचे होम क्वॉरंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाने रात्री उशीरा एक नोटिफिकेशन जारी केले आहे. यात दिल्ली, केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्ली एनसीआर येथून येणार्‍या प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. याच्या अंतर्गत या सहा राज्यांमधून येणार्‍या सर्व प्रवाशांची नोंद ठेवून त्यांची रेल्वे स्थानकावरच रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या चाचणीतून पॉझिटीव्ह आढळलेल्यांवर उपचार करण्यात येतील. तर प्रवासी निगेटीव्ह आढळला तरी त्याला त्याच्या घरी १४ दिवस होम क्वॉरंटाईन रहावे लागणार आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांना होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारण्याची व्यवस्था उभारण्याचे निर्देश सुध्दा या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेले आहेत.

यामुळे आता जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, रावेर आणि अमळनेर या रेल्वे स्थानकांवर उतरणार्‍या सर्व प्रवाशांची माहिती ही रेल्वेतील नोडल अधिकार्‍याच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे येणार आहे. तर, या स्थानकांवर आलेल्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग आणि रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्याची जबाबदारी ही स्थानीक महापालिका/पालिका प्रशासन वा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांची राहणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी़ जारी़ केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणार्‍यांवर भादंवि १८६० (४५)चे कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० आणि फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा या पत्रकात देण्यात आलेला आहे.

Protected Content