नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका उभारणार कोविड केअर सेंटर !

नंदुरबार प्रतिनिधी । कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेने कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश दिले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांनी एक कोविड सेंटर उभारून ते चालवावे आणि या केंद्रात जेवण, पाणी, स्वच्छता या सेवा पुरवाव्यात असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोविड सेंटर उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी या कोविड सेंटरला डॉक्टर व नर्सिंग सेवा पुरवतील. ऑपरेटर्स व इतर अनुषंगीक कामासाठी चांगले कर्मचारी अथवा शिक्षकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयातील कोविड विषाणू लॅबमध्ये दिवसाला २००० चाचण्यांची तपासणी करून अहवाल नागरिकांना मिळतील असे जिल्हा शल्य चिकीत्सकांनी नियोजन करावे आणि चाचणी अहवाल पोर्टलवर अपडेट करावा. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रमाणात रॅपीड अँटीजन विकत घ्याव्यात व त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून द्याव्यात. रॅपीड अँटीजन चाचणीत पॉझिटीव्ह आढळणाऱ्या रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण किंवा विलगीकरण कक्षात ठेवावे. या चाचणीत निगेटीव्ह आलेल्यांचे नमुने आरटीपीसीआर चाचणीसाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवावे. जिल्हा शल्य चिकीत्सकांनी आरटीपीसीआर चाचणी प्रलंबित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Protected Content