भंडारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसने सर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची नावे मागितली आहेत. विशेष म्हणजे या नावांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपला अर्ज सादर केला आहे. त्यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे पुन्हा एकदा उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांनी सुद्धा पुन्हा एकदा स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडी १६ ऑगस्टला प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती २० ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने २८८ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या काँग्रेस पक्षातील उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. त्यात साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांचा एकमेव अर्ज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे नाना पटोले हेच या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अर्जासोबत नाना पटोले यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे वीस हजार रुपयांचा डीडी देखील पक्षाला सादर केला आहे. या विधानसभा मतदारसंघाबरोबरच भंडारा विधानससभेसाठी ११ तर तुमसर विधानसभेसाठी ६ अशा एकूण तीन विधानसभेसाठी १८ उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.