रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पातोंडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच नम्रता समाधान कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याच्या कारणावरून अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी अपात्र ठरविले आहे. या निर्णयामुळे पातोंडीसह रावेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, ग्रामपंचायत स्तरावरील राजकारणात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. माजी सरपंच मोहन दशरथ बोरसे यांनी यासंदर्भात घेतलेल्या हरकतीनंतर झालेल्या सुनावण्यांअंती ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पातोंडी, ता. रावेर येथे सन २००३ मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदाची जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव होती. या राखीव जागेवरून नम्रता समाधान कोळी यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्या विजयी होऊन लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर निर्धारित मुदतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. याप्रकरणी पातोंडी येथील माजी सरपंच मोहन दशरथ बोरसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हरकत नोंदविली होती. संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित प्राधिकरणाकडून वेळोवेळी सुनावण्या घेण्यात आल्या. सुनावणीदरम्यान जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याचा मुद्दा विचाराधीन होता. अखेर या प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव डॉ. श्रीमंत हारकर यांनी नम्रता समाधान कोळी यांच्यावर अपात्रतेची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयामुळे पातोंडी ग्रामपंचायतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोकनियुक्त सरपंचपदाशी संबंधित या प्रकरणात प्रशासकीय पातळीवर झालेल्या कारवाईचे ग्रामपंचायतीच्या पुढील घडामोडींवर काय परिणाम होतात, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तसेच या आदेशानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया कशी राबविली जाते, याबाबतही उत्सुकता व्यक्त होत आहे. दरम्यान, या कारवाईबाबत सरपंच नम्रता समाधान कोळी यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई झाल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतरच यासंदर्भात आपली प्रतिक्रिया देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.



