चाळीसगाव प्रतिनिधी । कन्नड घाटाजवळ भाऊच्या ढाब्याजवळ बुधवारी रात्री अज्ञात गाडीतून महिलांनी नवजात स्त्री जातीच्या बालिकेला तिच्या मातेने रोडच्या बाजूला टोपली खाली झाकून पलायन केल्याची घटना घडली. ढाबा मालक आणि पोलीसांच्या सतर्कतेने ‘नकुशी’ असलेल्या बालिकेचा जीव वाचविला.
याबाबत माहिती अशी की, कन्नड घाटाच्या वर भाऊच्या ढाब्यासमोर बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास कन्नडकडून येणारी क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. त्यातून काही महिला खाली उतरल्या, बराच वेळ झाल्याने धाबा मालक त्या गाडीकडे गेल्यानंतर त्यांना विचारपूस केली. एवढ्या रात्री इथेच थांबले असे विचारले असता ड्रायव्हरने लघुशंकेचे कारण सांगून आम्ही निघतो आहे असे सांगितले. थोड्या वेळाने तेथून चाळीसगावच्या दिशेने निघून गेले, परंतु काही वेळानंतर धाबा मालकाला रस्त्याच्या कडेला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने तो तिकडे धावून गेले. त्यांना एका टोपल्या खाली असलेल्या लहान बाळाचा रडण्याचा आवाज होता. त्यांनी ताबडतोब घाटातील वायरलेस यंत्रणा येथे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस प्रवीण पाटील यांना जाऊन ही हकीकत सांगितली. प्रवीण पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन पाहिले. एका महिलेने स्री जातीच्या बाळाला जन्म दिलेला होता व ते त्यांनी टोपली खाली झाकून निघून गेल्याचे लक्षात आले. 108 अंबुलान्सला ताबडतोब फोन केला परंतु ॲम्बुलन्स लवकर आले नाही. त्याच्यात कन्नड ग्रामीण पोलिसांची गाडी पेट्रोलिंग करत असताना तेथे पोहोचली पोकॉ प्रवीण पाटील यांनी अंगावरचे रुमाल व टोपी काढून त्या बाळाच्या अंगावर झाकून त्याला कन्नड ग्रामीण पोलिसांच्यासोबत कन्नड रुग्णालयात पाठवण्यात आले.
घटनास्थळी महामार्ग पोलीसांची धाव
या घटनेची माहिती फोनवरून चाळीसगाव महामार्गचे पोहेकॉ योगेश बेलदार, पोहेकॉ वीरेन्द्र राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेवून क्रुझार गाडीचा शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला मात्र मिळून आली नाही. चाळीसगाव पोलिसांच्या या कार्यतत्परतेमुळे एका निरागस बाळाचा जीव वाचला, त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी प्रवीण पाटील यांना दोन पोलीस मित्र प्रवीण गोत्रे व भोलाभाऊ यांनी मोलाचे सहकार्य केले.