भडगाव प्रतिनिधी । भडगाव पंचायत समिती येथे कार्यरत शाखा अभियंता एन.व्ही. आखाडे यांना पाचोरा पंचायत समिती येथे कार्यरत असताना विविध कर्तव्ये बजावत असताना वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशियाना यांची स्वाक्षरी असून सदर आदेश काल भडगाव पंचायत समितीला प्राप्त झाला आहे.
भडगाव पंचायत समिती येथे कार्यरत शाखा अभियता. एन. व्ही. आखाडे हे यापुर्वी पाचोरा पंचायत समिती येथे कार्यरत असताना त्यांनी २०१५-१६ मध्ये नगरदेवळा येथे दलित वस्ती सुधार योजने अतर्गत विकास कामे, वडगाव मुलाणे येथे जिल्हा ग्रामीण विकास निधी मधुन काँक्रीटीकरण करणे, सार्वे प्र.भ. येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे, नेरी येथे दलीत वस्ती सुधार योजने अतर्गत विकास कामे पुर्ण झालेली असताना या कामाच्या मोजमाप पुस्तिकेत (एम. बी.) नोंदी करीत नसल्याने कामाचे बिले ग्रामपंचायतीस मिळत नसल्याने त्या भागातील जि.प. सदस्य यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती.
सदरची विकास कामे ही पुर्ण झालेली असताना त्या कामाचे मोजमाप होत नसल्याने ग्रामपंचायतीस पुढील विकास कामाचा निधी मिळण्यास अडचण येत होती. विकास कामावर त्याचा परीणाम होत होता. सोपवलेल्या कामकाजात हेतु पुरस्कार दुर्लक्ष करणे, दिलेले कामकाज पुर्ण न करणे, वरीष्ठाच्या आदेशाचे पालन करणे व कर्तव्यात कसुर करणे या कारणामुळे शाखा अभियंता एन. व्ही. आखाडे यांना सेवेतुन निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात शाखा अभियंता एन. व्ही. आखाडे यांचे मुख्यालय हे पारोळा असुन सदर कालावधीत मुख्यालय सोडु नये, असे आदेश नमुद आहे. हे निलंबनाचे आदेश कालच भडगाव पंचायत समितीस प्राप्त झाले असुन त्यास गट विकास अधिकारी आर. ओ. वाघ यांनी दुजोरा दिला आहे.