पुणे वृत्तसंस्था । ‘राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असं काहीही मी बोललेलो नाही. याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे,’ असा खुलासा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला. पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला गेला,’ असं अनिल देशमुख यांनी म्हटल्याचं वृत्त आज प्रसिद्ध झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला होता, असंही प्रसिद्ध झालं होतं. देशमुख यांना याविषयी विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दांत हे वृत्त फेटाळून लावलं. ‘मी असं काहीही बोललेलो नाही,’ असं ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना महाराष्ट्र पोलीस थकले, मात्र हिंमत हरले नाहीत,’ अशा शब्दांत त्यांनी पोलिसांचे कौतुकही केले. लॉकडाऊनच्या काळात वाधवान बंधूंना प्रवासाची परवानगी दिल्याप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. याबाबत ते म्हणले , ‘अमिताभ गुप्ता यांची वावधन प्रकरणात चौकशी झाली असून खात्याने सुचविल्यानुसार त्यांना शिक्षाही झाली आहे,’ असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.
‘पोलीस खात्यातील प्रस्तावित भरतीबाबत मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने साडेतेरा टक्के जागा राखून ठेवून इतर भरती करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्यात येत आहेत,’ असंही देशमुख यांनी सांगितलं.