मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यंदाच्या लोकसभा निवडणुकांपासून राज्यात एकनाथ खडसे यांची घरवापसी अर्थात पुन्हा भाजपात प्रवेश होण्याची चर्चा सुरू झाली होती. याला खुद्द एकनाथ खडसे यांनीही दुजोरा दिला होता. त्यानुसारच त्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचारही केला. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसेंचा भाजपा प्रवेश काही होताना दिसत नव्हता. यावरून बरेच दावे-प्रतिदावे झाल्यानंतर अखेर एकनाथ खडसेंनी स्वत:च भाजपाप्रवेश होण्याची शक्यता मावळल्याचे सूतोवाच दिले. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण घटनाक्रमावर एकनाथ खडसे यांनी आता खुलासा केला आहे.
एकनाथ खडसे यांनी टीव्ही ९ वृत्तवाहणीशी बोलताना जयंत पाटलांनी माझा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नसल्याचे नमूद केले आहे. “मी भाजपात प्रवेश केलेला नाही. मी आजही शरद पवार गटात आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पण पक्षाध्यक्षांनी तो स्वीकारलेला नाही. मी स्वत:हून भाजपात मला प्रवेश द्यावा अशी विनंती कधीही केली नव्हती. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मला सूचना केली होती की तुम्ही भाजपामध्ये या. मी त्यांना सांगितले की मी विचार करेन. म्हणून भाजपात जाण्याचा विषय आला”, असे एकनाथ खडसे म्हणाले.
खडसे पुढे म्हणाले “भाजपात प्रवेश करावा अशी विनंती मला वरीष्ठांकडून आली. मी म्हणालो थोडा वेळ द्या. त्यांनी मला सांगितले, वेळ कशाला, आत्ताच प्रवेश करा. मी दिल्लीत होतो. विनोद तावडे, रक्षा खडसेंसह मी नड्डांना भेटलो. त्यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात मफलर घालून सांगितलं की तुमचा प्रवेश झाला. पण त्या प्रवेशाला राज्यातील काही नेत्यांकडून विरोध झाला. त्यामुळे माझा भाजपाप्रवेश थांबला”, लोकसभेची निवडणूक होती. त्यात भाजपाचे ९ खासदार निवडून आले. तेव्हा भाजपाची स्थिती नाजूक असल्याचे सर्वेमध्ये दिसत होते. भाजपाला बळकटी मिळावी या हेतूने वरीष्ठांनी मला भाजपा प्रवेशाची विनंती केली असावी. रक्षा खडसे निवडणुकीत उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना मदत करण्याचं आवाहन भाजपातून मला करण्यात आलं होतं. मी त्यांना मदत केली, त्या निवडून आल्या. तोपर्यंत मी चांगला होतो. पण निवडून आल्यानंतर मात्र प्रवेशाला विरोध झाला”, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
“भाजपातले काही लोक आम्ही यांना साथ देणार नाही, आमचे केडर बंद होईल वगैरे सांगू लागले. ज्या माणसाने ४० वर्षं भाजपा उभी केली, हे आत्ता बोलणारे माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. या सगळ्यांना राजकीय जीवनात मी बळ दिलं आहे. पण आज तेच काही कारणाने विरोध करत आहेत. हरकत नाही, मीही काही भाजपात जाण्यासाठी फारसा उत्सुक नव्हतो. यासंदर्भात गिरीश महाजन किंवा देवेंद्र फडणवीसांकडून विरोध होऊ शकतो. गिरीश महाजनांनी यावर वारंवार प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला संभ्रम आहे की राज्यातले नेते मोठे आहेत की नड्डा मोठे आहेत?” असा प्रश्न एकनाथ खडसेंनी यावेळी उपस्थित केला आहे.