Home आरोग्य ‘माझा बीएलओ, माझा अभिमान’ : बीएलओंच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी डॉ. नितु पाटील यांचा...

‘माझा बीएलओ, माझा अभिमान’ : बीएलओंच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी डॉ. नितु पाटील यांचा संवेदनशील पुढाकार

0
6

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेत रात्रंदिवस कार्यरत असलेल्या बीएलओ (Booth Level Officer) आणि बीएलए-२ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चिंता लक्षात घेऊन वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाच्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांनी कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. मतदार नोंदणीचे काम करताना सतत मोबाईल व संगणकाच्या स्क्रीनसमोर तासन्तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर वाढणारा ताण कमी करण्यासाठी त्यांनी वैद्यकीय मार्गदर्शनासह आवश्यक मदतीची ग्वाही दिली आहे.

सध्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेंतर्गत बीएलओ आणि बीएलए-२ कर्मचारी दिवसभर घरभेटी घेऊन नागरिकांची माहिती व कागदपत्रे संकलित करीत आहेत. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ‘ई-सिनेट (ecinet)’सारख्या डिजिटल प्रणालीद्वारे माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असते. या सततच्या स्क्रीन वापरामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (Computer Vision Syndrome) तसेच ड्राय आयज (Dry Eyes) यांसारख्या डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

डोळे लाल होणे, सतत पाणी येणे, अंधुक दिसणे, डोळ्यांत जळजळ किंवा दुखणे, काहीतरी खुपल्यासारखे वाटणे अशा तक्रारी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. नितु पाटील यांनी बीएलओ बांधवांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारत त्यांना लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स (Lubricating Eye Drops) वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे आय ड्रॉप्स डोळ्यांतील कोरडेपणा कमी करून आवश्यक ओलावा टिकवून ठेवण्यास आणि डोळ्यांना आराम मिळवून देण्यास मदत करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच स्क्रीनवर दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही आवश्यक सवयी अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दर २० मिनिटांनी २० फूट अंतरावरील वस्तूकडे किमान २० सेकंद पाहण्याचा २०-२०-२० नियम पाळावा, स्क्रीनकडे पाहताना नियमित डोळ्यांची उघडझाप करावी, तसेच मोबाईलमध्ये ब्लू लाईट फिल्टर सुरू ठेवणे किंवा अँटी-ग्लेअर चष्म्याचा वापर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

विशेष म्हणजे, केवळ वैद्यकीय सल्ल्यापुरते न थांबता डॉ. पाटील यांनी बीएलओ कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हातही पुढे केला आहे. “देशाच्या लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या माझ्या सर्व बीएलओ बांधवांना कामाच्या दरम्यान डोळ्यांचा कोणताही त्रास जाणवत असल्यास त्यांनी कोणताही संकोच न बाळगता मला थेट फोन करावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी. आवश्यक वैद्यकीय तपासणी, मार्गदर्शन आणि आय ड्रॉप्स उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे,” अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे. ‘माझा बीएलओ, माझा अभिमान’ या भावनेला कृतीत उतरवत डॉ. नितु पाटील यांनी दाखविलेली ही संवेदनशीलता बीएलओ कर्मचाऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून, मतदार यादी पुनरीक्षणाचे महत्त्वाचे काम अधिक जोमाने आणि सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत आहे.


Protected Content

Play sound