हैदराबाद वृत्तसंस्था | ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने सूर्यनमस्कारांना पुन्हा एकदा विरोध केला असून यानिमित्त आयोजीत कार्यक्रमांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांनी जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळांमध्ये १ ते ७ जानेवारी दरम्यान सूर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या अनुषंगाने विविध शाळांमध्ये सूर्यनमस्कारांचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. तर २६ जानेवारी रोजी सूर्यनमस्कारावर आधारित संगीत कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार शाळांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आंध्र प्रदेशच्या सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात तसे आदेश येऊन धडकले आहेत, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने आपल्या पत्रात म्हटले आहे.
या निर्णयाला पर्सनल लॉ बोर्डाने विरोध केला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे महासचिव हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी या निर्णयावर आक्षेप घेताना म्हटले आहे की, भारत एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक आणि बहु-सांस्कृतिक देश आहे. यावर आधारितच आपली राज्यघटना लिहिण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी शिक्षण संस्थेमध्ये धर्माबाबत शिक्षण द्यायला किंवा कोणत्या एका विशेष समूहाच्या मान्यतेच्या आधारावर कार्यक्रमाचे आयोजन करायला, आपली राज्यघटना परवानगी देत नाही. सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे दुर्दैवी घटना असून, सध्याचे सरकार राज्यघटनेच्या मूळ उद्देशापासून भटक आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. शिवाय मुस्लीम मुला-मुलींनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
रहमानी यांनी पुढे म्हटले आहे की, सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे हे घटनाविरोधी कृत्य आहे. देशप्रेमाचा खोटा प्रचार आहे. सूर्यनमस्कार हा सूर्याच्या पूजेचा एक प्रकार आहे. मुस्लीम किंवा इतर अल्पसंख्याक ना सूर्याला देव मानतात ना त्याची उपासना, पूजा करतात. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेत धर्मनिरपेक्षता मूल्याचा सन्मान करावा, असे आवाहन केले आहे. शिवाय देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन केले आहे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, देशाच्या सीमेचे रक्षण याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.