अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या खटल्यात मुस्लिमांच्या बाजूनं पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटनं सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्यावतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अन्सारी यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण पत्रिका दिली. येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
या कार्यक्रमाचं निमंत्रण अन्सारी यांनी स्विकारलं असून आपण या सोहळ्यासाठी हजेरी लावणार असल्याचं म्हटलं आहे. अन्सारी पुढे म्हणाले, अयोध्येत भगवान राम आता विराजमान होत आहेत. जे लोक इथं येऊन दर्शन घेतील पुजाअर्चा करतील ते चांगलं काम करतील. यामुळं त्यांची नियत पण चांगली राहिल, रामानं सांगितलेल्या रस्त्यावर ते लोक चालतील.
आम्हाला वाटतं की, लोकांनी आपल्या धर्माच्या शिकवणुकीप्रमाणं चालावं तसेच त्यांनी सर्वांबरोबर चांगलं वागावं. आम्हाला याचा आनंद आहे की, भगवान राम आता प्रत्यक्ष मंदिरात विराजमान होत आहेत. तसेच सर्वांना एक सल्ला देतो की अयोध्या एक अशी जमीन आहे जिथं हिंदु-मुस्लीम-शीख-ख्रिश्चन सर्वांमध्ये मैत्रीभाव आहे आणि तो पुढेही सुरु राहिल. २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला याचा संपूर्ण देशातील मुसलमानांनी सन्मान केला. एकात्मता राहिली आहे. कुठेही धरणं आंदोलनं झालं ना काही. आज हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कोणतीही फूट नाही, मंदिराचं काम पूर्ण झालं आहे आणि तिथं आता भगवान राम विराजमान होणार आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये बंधुभाव आहे. सध्या अयोध्यावासी खूश आहेत, आम्ही खूश आहोत आणि आमचा समाजही खूश आहे, असे अन्सारी म्हणाले.