लिव्ह इन पार्टनरची केली हत्या; आरोपीला अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लिव्ह इन पार्टनरची हत्या करणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीला नागपाडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. महिलेसोबत झालेल्या वादातून आरोपीने तिच्या पोटावर चाकूने वार केले. पण महिला अपघातात जखमी झाल्याचा बनाव करण्यात आला होता. अखेर वैद्यकीय तपासणीत मृत्यूचे कारण उघड झाल्यानंतर नागपाडा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

आरती सिंह असे मृत महिलेचे नाव असून ती आरोपी सिराजुद्दीन जमालुद्दीन शेख ऊर्फ चाँद (४१) याच्यासोबत नागपाड्यातील सोलंकी उद्यानाच्या पदपथावर राहत होती. उभयतांमध्ये १२ जून रोजी कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या चाँदने आरतीला बेदम मारहाण केली व तिच्या पोटावर चाकूने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. आरतीला आग्रीपाडा येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीने भांडणादरम्यान तिच्या पोटाला खिळा लागल्याची खोटी माहिती दिली. उपचारादरम्यान २० जून रोजी आरतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती.

महिलेची वैद्यकीय तपासणी व पोलिसांनी केलेल्या तपासात तिला गंभीर मारहाण झाल्याचे व तिच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती उघड झाली. आरोपीने दोघांमध्ये झालेल्या वादानंतर आरतीला खिळा लागल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शुक्रवारी आरतीची बहिण रिहाना सय्यद (लग्नापूर्वीचे नाव सरस्वती सानप) हिच्या तक्रारीवरून चाँदविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मोबाइलद्वारे आरोपीचा शोध घेण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. आरोपी चाँद विरोधात २०२१ मध्येही नागपाडा पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीने हत्येसाठी वापरलेला चाकू अद्याप हस्तगत करण्यात आलेला नसून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत आरती मूळची अमरावती येथील रहिवासी होती. तेथे तिच्या दोन मुली आहेत. पतीसोबत पटत नसल्यामुळे ती मुंबईत आली होती. येथे तिने विजय सिंह नावच्या व्यक्तीसोबत लग्न केले होते. त्याच्यापासून तिला चार मुली होत्या. मृत महिला गेल्या एक वर्षांपासून आरोपी चाँदसोबत फॉरस रोड परिसरात पदपथावर राहत होती. तिच्या पोटावर व पायावर गंभीर जखमा असून त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Protected Content