Home आरोग्य महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात; महापुरुषांना अभिवादन, महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीनचे...

महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात; महापुरुषांना अभिवादन, महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीनचे लोकार्पण

0
116


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन शनिवारी (२१ मार्च) उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शहराच्या विकासाचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेदहा वाजता झाली. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या प्रांगणातील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापती सिंधूताई कोल्हे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि सभागृह नेते नितीन लढ्ढा यांच्यासह उपस्थित नगरसेवक व अधिकाऱ्यांनी वंदन केले.

स्थापना दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्याचा विचार करत महापालिकेत ‘सॅनिटरी वेंडिंग मशीन’ बसविण्यात आले असून, त्याचे लोकार्पण महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सिंधुताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या सहाव्या मजल्यावरील महिला व बालकल्याण विभागाजवळ उभारण्यात आलेल्या या सुविधेमुळे महिला कर्मचारी तसेच येणाऱ्या अभ्यागतांना मोठा दिलासा मिळणार आहे. या अभिनव उपक्रमाचे नगरसेविका आणि महिला अधिकाऱ्यांनी स्वागत करत प्रशासनाचे कौतुक केले.

या सोहळ्याला महापालिकेतील विविध विभागांचे प्रमुख, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या प्रांगणात रांगोळी, फुलांची सजावट आणि प्रवेशद्वाराजवळ फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या प्रगतीचा आढावा घेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला. एकात्मता, सेवा आणि विकासाचा संदेश देत हा स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 


Protected Content

Play sound