बीड प्रतिनिधी । अवघ्या राज्याला हादरा देणार्या भ्रूण हत्या प्रकरणात परळी येथील डॉ. सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी सरस्वती मुंडे यांना बीड जिल्हा न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
धारूर तालुक्यातील महिला विजयमाला पटेकर या महिलेचा १८ मे २०१२ रोजी गर्भपात करीत असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर या रुग्णालयात सुरू असलेला अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धंदा जगासमोर आला होता. या प्रकरणी परळी येथील डॉ.सुदाम मुंडे व डॉ.सरस्वती मुंडे या दाम्पत्यासह १७ आरोपींविरोधात बीड येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. स्त्री भ्रूणहत्या रोखणारा पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार हे तिघेही दोषी ठरले आहेत. भारतीय दंड विधानाच्या ३१२,३१३,३१४,३१५,,तसेच ३१८ एम टी पी ऍक्ट ३,५ कलम नुसार यांना दोषी ठरवत दहा वर्षे शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे. पीडितेचा पती महादेव पटेकर यालाही याप्रकरणी दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी ठोठावण्यात आली. तर उर्वरीत दहा आरोपी सबळ पुराव्या अभावी निर्दोष ठरले आहेत.
दरम्यान, गेली साडेसहा वर्षे सुदाम मुंडे नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात असल्याने तो कालावधी वजा करून उर्वरित शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे.