ब्रुक फार्माच्या संचालकाची चौकशी; फडणवीस भडकले !

मुंबई प्रतिनिधी । रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणार्‍या ब्रुक फार्मा या कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस चौकी गाठून या प्रकरणी विचारणा केली. यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असून यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, विलेपार्ले येथे कार्यालय असणार्‍या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी काल सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा करून ठेवल्याच्या आरोपातून पोलिसांनी चौकशी सुरू केली. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला. त्यावेळी पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले.

या सगळ्या घटनाक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला. “एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलिस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. पोलिस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आम्ही महाराष्ट्राला मदत करण्यासाठी काम करत असून, फक्त आम्ही करत आहोत म्हणून त्रास दिला जात असेल तर योग्य नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.