मुंबई प्रतिनिधी । मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोरील स्फोटके, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे या प्रकरणांमुळे गोत्यात आलेले परमबीरसिंग यांची मुंबई आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठकी सुरु होत्या. यात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा पार पडली. रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरु होती. यानंतर आज गृहमंत्राच्या बंगल्यावर आज याप्रकरणी बैठक पार पडली.
दरम्यान, आज दुपारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली. यानुसार परमबीरसिंग यांच्या जागी हेमंत नगराळे यांची मुंबई आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.