मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील गौरव गोपाल भंडारे यांनी राष्ट्रीय स्तरावरील GATE (Graduate Aptitude Test for Engineering) – Biotechnology परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अखिल भारतीय रँक 4053 मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे.
सध्या गौरव हे शिरपूर येथील एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. GATE परीक्षेत मिळवलेल्या या यशामुळे त्यांच्यासाठी देशातील नामांकित IIT आणि NIT संस्थांमध्ये M.Tech करण्याचा मार्ग खुला झाला आहे. कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

गौरव यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आई-वडिलांनी मजुरी करून मुलाच्या शिक्षणासाठी केलेले कष्ट आणि त्याग हे या यशाचे खरे आधारस्तंभ ठरले आहेत. तसेच, नर्सरीपासून बारावीपर्यंत श्री मासुळे सर यांचे मार्गदर्शन आणि सध्याच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.
गौरव यांच्या या यशामुळे मुक्ताईनगर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्वत्र त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला आहे.



