मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील नागरिक सध्या चिखलाच्या समस्येने त्रस्त झाले असून, नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपंचायत आवारात आणि इतर भागात पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील अनेक भागांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मूलभूत सुविधा पुरवण्यात नगरपंचायत अपयशी ठरत असल्याचा आरोप शहरवासीयांकडून केला जात आहे.
शहरातील मुख्य रस्ते असोत किंवा वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते, सर्वत्र चिखल आणि गटारांचे सांडपाणी साचल्याचे चित्र आहे. यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही मार्ग काढणे कठीण झाले आहे. रस्त्यांवरून चालताना घसरून पडण्याचे प्रकारही वाढले आहेत. नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचणेही मुश्किल झाले असून, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास होत आहे.

नगरपंचायतीने पावसाळापूर्व कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गटार स्वच्छतेचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था आणि पाण्याचा योग्य निचरा न होणे, या प्रमुख कारणांमुळे चिखलाची समस्या अधिक गंभीर झाली आहे. “नगरपंचायत आम्हाला मूलभूत सुविधा कधी पुरवणार?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील घरांना या चिखलातून दिलासा कधी मिळणार, याकडे आता सर्व मुक्ताईनगरवासीयांचे लक्ष लागले आहे. नगरपंचायतीने तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



