मुक्ताईनगर प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या ऑक्सीजनचा तुटवडा पाहता जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रूग्णालयात नैसर्गिक प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची उभारणी करावी अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकार्यांना पत्र दिले आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात कोविडग्रस्तांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली असून ऑक्सीजनचा तुटवडा देखील जाणवत आहे. ऑक्सीजन अभावी रूग्णांचे प्राण जाण्याचे प्रकार देखील घडू लागले आहेत. या पार्श्वभूमिवर, खासदार रक्षाताई खडसे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पत्र सादर केले आहे.
पत्राद्वारे पाठविलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची कोरोनाबाबत परिस्थिती चिंताजनक असून खान्देशातील रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रामुख्याने ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोठी रांग लावावी लागत आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी आपल्या जीवाला मुकावे लागणार्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची येऊ घातलेली दुसरी लाट भयंकर असून रुग्णांच्या उपचारांसाठी रावेर लोकसभेसह जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी व सामान्य रुग्णालयात नैसर्गिक प्राणवायू निर्मिती प्लांटसाठी मंजुरी देऊन त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
यात म्हटले आहे की, रुग्णांची वाढ पाहता ऑक्सिजनचा तुटवडा लवकरच निर्माण होऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्थेला प्राधन्य देऊन येणार्या समस्यांसाठी आत्मनिर्भर राहण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी नैसर्गिक प्राणवायू निर्मिती प्रकल्पाला मंजुरी देण्यात यावी. तसेच जिल्ह्याभरातील प्रत्येक कोरोना दवाखान्यात नैसर्गिक प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात यावा, ज्यामुळे रुग्णांना प्राणवायूची उपलब्धता होऊन विनाअडथळा परिपूर्ण उपचार मिळविता येतील. या नैसर्गिक प्राणवायू निर्मिती प्रकल्पासाठी निधी तातडीने अत्यावश्यक असून लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा असे निवेदन खा. रक्षाताई खडसे यांनी पत्राच्या माध्यमातून केले आहे.