प्रदेशाध्यक्षांची पाठ वळत नाही तोच राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील जिल्हा दौर्‍यावरून मुक्ताईनगरच्या पुढे निघत नाही तोच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे जिल्हा दौर्‍यावर होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर विविध कार्यकारिण्यांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा दौरा आयोजीत करण्यात आला होता. यात जळगावमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यालयात त्यांनी मेळावा घेतला. यानंतर ते दुपारी मुक्ताईनगरात दाखल झाले. त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी अनौपचारीक चर्चा केली. यानंतर ते पुढे मलकापूरकडे निघाले.

दरम्यान, जयंत पाटील मुक्ताईनगरमधून बाहेर पडत नाही तोच, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत ( शिंदे गट) प्रवेश केला. यात मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील ग्रामपंचायत सदस्य अरुण गायकवाड व सौ मीनाक्षी गायकवाड यांनी समर्थकांसह राष्ट्रवादीचा त्याग करून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासोबत तालुक्यातील रिगाव येथील शेकडो तरूणांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. आपली आजवरची विकासाभिमुख वाटचाल राहिली असून आगामी काळात देखील कोणताही भेद न बाळगता जनसेवेला आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष छोटू भोई यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content