मुक्ताईनगरात विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे उपोषण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे विविध मागण्यांसाठी आज दिव्यांगांनी उपोषण केले. भर पावसात झालेल्या या उपोषणाची दखल घेत समस्या सोडविण्याचे आश्‍वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.

विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी स्वातंत्र्य दिनी डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या समोर उपोषण केले. नगर पंचायत आणि ग्राम पंचायतीच्या उत्पन्नातील पाच टक्के निधी बँक खात्यात जमा व्हावा, परिवाराला ५० टक्के कर सवलत मिळावी या मागण्यांसाठी दिव्यांगांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता, त्याची अंमलबजावणी न झाल्याने अखेर येथील पंचायत समितीसमोर सकाळी उपोषण सुरू करण्यात आले.

दरम्यान, तहसीलदार श्याम वाडेकर आणि नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अश्‍विनी गायकवाड यांनीदेखील लेखी आश्‍वासन दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. प्रशासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Protected Content