मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील पत्रकार आतीक बिलाल खान यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी हल्ला चढवल्याने पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वायरल न्यूज लाईव्हचे पत्रकार आतिक बिलाल खान (वय ४७, रा. मुक्ताईनगर) हे आपल्या मुलाचे इंजेक्शन आणण्यासाठी काल धुळे येथे गेले होते. धुळे येथून परतत असताना गुरूवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास जळगाव विद्यापीठ ते गुजराल पेट्रोल पंपाच्या मध्ये त्यांच्या स्विफ्ट गाडी नंबर एमएच १८डब्ल्यू ६८८५ ला मागून ओव्हरटेक करून प्रत्येकी डबलसीट असणारे दोन मोटर सायकल स्वार यांनी त्यांची कार थांबवली. यांनतर या चार लोकांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी तोंडावर, छातीवर मारा करत त्यांच्या खिशातील ६०० रुपये रोख व एक पेन हिसकावून घेत पळून गेले.
या संदर्भात आतीक बिलाल खान यांनी मुक्ताईनगर येथे येऊन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड व पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी फिर्याद घेऊन कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून सीसीटिएनएस प्रणालीने शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर येथील पत्रकारांनी पोलीस उपअधिक्षकांची भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.