मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील रहिवासी सुनील दैवे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण मुक्ताईनगर तालुका आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संशयित आरोपींनी केलेल्या मारहाणीत सुनील दैवे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेला काही दिवस उलटूनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी सुनील दैवे यांना समाजकंटकांकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका सामान्य नागरिकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वसामान्य जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याने मुक्ताईनगर व परिसरातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले असून, आरोपींना २४ तासांच्या आत अटक करण्याची मागणी केली आहे. “जर आरोपींना तात्काळ बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत, तर पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल,” असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
केवळ अटकच नव्हे, तर या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर पीडित दैवे कुटुंबाला सरकारने तात्काळ आर्थिक मदत आणि संरक्षण पुरवावे, अशी विनंतीही नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे सध्या मुक्ताईनगर परिसरात तणावपूर्ण शांतता असून, चौकाचौकात या प्रकरणाचीच चर्चा सुरू आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष तपास करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा समाज प्रतिनिधींनी दिला आहे.



