दाखले वितरीत करा, अन्यथा बिर्‍हाड मोर्चा काढणार ! : आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी बांधवांना तात्काळ दाखले न मिळाल्यास प्रांताधिकारी कार्यालयावर बिर्‍हाड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

शासन आपल्या दारी या शासनाच्या अभिनव कार्यक्रमांतर्गत आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले व इतर दाखल्यांच्या संदर्भात शिबीर घेण्यात आलेलं होते. या शिबिरानंतर सुमारे आठ महिने उलटूनही अद्याप पावेतो संबंधित आदिवासी बांधवांना एकही दाखला वितरित केला नसल्याने महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत आ.चंद्रकांत पाटील प्रचंड संतप्त झालेले आहेत.

या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना पत्र देवून तात्काळ दाखले वितरित करा अन्यथा हजारो आदिवासी बांधवांसह निष्क्रिय महसूल प्रशासनाच्या विरोधात बिर्‍हाड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यासाठी दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी शासन आपल्या दारी या शासनाच्या अभिनव कार्यक्रमांतर्गत आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले व इतर दाखल्यांच्या संदर्भात शिबीर घेण्यात आलेलं होते. त्या शिबिरामध्ये ४०० च्या वर आदिवासी बांधवांचे अर्ज आपल्याकडे प्राप्त आहेत. परंतु आज रोजी ऑक्टोंबर २०२३ महिना सुरु असून म्हणजेच सुमारे ८ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप पावेतो महसूल प्रशासनाकडून सदरील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले किंवा तत्सम अर्जानुसार कुठल्याच प्रकारचे इतर दाखले वितरीत करण्यात आलेले नाही.

त्यामुळे येत्या दोन दिवसात आदिवासी बांधवांनी केलेल्या अर्जानुसार जातीचे दाखले व इतर दाखले वितरीत न केल्यास मुक्ताईनगर तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय, भुसावळ भाग भुसावळ येथे आदिवासी बांधवांसमवेत बिर्‍हाड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Protected Content