मुक्ताईनगर प्रतिनिधी । कुणी कितीही अपप्रचार केला तरी मुक्ताईनगर मतदारसंघातील अल्पसंख्यांक समाज हा आपल्यासोबतच असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ते भाजप अल्पसंख्यांक मेळाव्यात बोलत होते.
भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एकनाथराव खडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, जिल्हा बँक अध्यक्षा सौ रोहिणीताई खडसे- खेवलकर, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमाताई तडवी, बोदवड नगराध्यक्षा मुमताजबी बागवान, पं. स. सभापती शुभांगी भोलाणे, उपनगराध्यक्ष मानिषा पाटील,अल्पसंख्याक आघाडी जिल्हा अध्यक्ष शकील सर,सावदा येथील असगरभाई, कालू मिस्त्री, ताहेर खान पठाण, नगरसेवक शकील बापू ससाणे, निलेश शिरसाट, मस्तान कुरेशी, आमिन खान,नूर मोहम्मद खान, आरिफ आजाद, उसमा रउफ खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अशोक कांडेलकर यांनी भाजपा सरकार ने अल्पसंख्याक समाजासाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. तर मोहम्मद हुसेन खान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नाथाभाऊ हे गेल्या तीस वर्षांपासून अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन चालत आहेत कोणी कितीही अपप्रचार केला तरी आपल्याला नाथाभाऊ यांच्या पाठीशी कायम उभे राहायचे आहे. खा. रक्षाताई खडसे म्हणाल्या भाजप आणि नरेंद्रजी मोदी नेहमी अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी आहेत. समाजाच्या विकासासाठी केंद्र राज्य सरकार ने विविध योजना आणल्या आहेत या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ. एकनाथराव खडसे म्हणाले की, गेल्या तीस वर्षांपासून मी आपले नेतृत्व करत आहे. परंतु कधी जातीत भांडणे लावले नाही. अल्पसंख्याक समाजाला नेहमी मी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केलेत. सत्तेत प्रतिनिधित्व दिले. मुक्ताईनगर बोदवड येथे प्रथम नगराध्यक्ष अल्पसंख्याक समुदायातील केले. अल्पसंख्याक मंत्री असताना उर्दु भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी राज्यात मालेगाव भिवंडी अशा पाच ठिकाणी उर्दू हाऊस ची निर्मिती केली. नेहमी अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी असुन यापुढे सुद्धा राहील. आपण आता पर्यंत जो मतदानरुपी आशिर्वाद दिला तो भूलथापांना बळी न पडता असाच कायम रहावा अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.