मुक्ताईनगर गेले, बोदवड गेले, आता उरले सावदा…! तगडी फाईट निर्णायक वळणावर

मुक्ताईनगर/बोदवड/सावदा : पंकज कपले-सुरेश कोळी-जितेंद्र कुलकर्णी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असणार्‍या बोदवडच्या नगराध्यक्षा आणि सर्व सहकार्‍यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांना जोरदार धक्का दिला आहे. मतदारसंघातील तीन नगरपालिकांपैकी मुक्ताईनगर आणि बोदवड येथे शिवसेनेची अघोषीत सत्ता आली आहे. तर खडसेंची मदार आता सावद्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन निवडणुकीच्या आधीच्या हा घडामोडींचा आगामी निवडणुकीवर तर परिणाम होणार आहेच. पण खडसे आणि पाटलांच्या फाईटमध्ये एक नवीन मनोरंजक वळण देखील यातून आल्याचे दिसून येत आहे. विशेष करून आमदार पाटलांनी मतदारसंघावरील आपली पकड मजबूत केल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

२०१९ सालच्या अखेरीस झालेल्या www.livetrends.news विधानसभा निवडणुकीत नाट्यमय घटना घडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे तिकिट भाजपने कापले. खडसेंऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना तिकिट देण्यात आले. मात्र चंद्रकांत पाटलांची तगड्या फाईटमध्ये त्यांचा पराभव केला आणि मुक्ताईनगर मतदारसंघात नव्या इतिहासाची नोंद झाली. तब्बल ३० वर्षानंतर खडसे नावाऐवजी पाटील नाव आले आणि बर्‍याच बाबी बदलत गेल्या.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या बेरजेच्या राजकारणाचा त्यांना लाभ झाला. www.livetrends.news तसेच निवडून आल्यानंतर त्यांनी हाच पवित्रा कायम ठेवला. यामुळे गेल्या ऑक्टोबर महिन्यात एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत मतदारसंघातील मोजके पदाधिकारी त्यांच्यासोबत गेले. तेव्हाच मतदारसंघातील हवा बदलल्याचा अंदाज आला. यानंतर मे महिन्यात मुक्ताईनगरातील दहा नगरसेवकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबतीने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खळबळ उडाली. तर आज बोदवड येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा मुमताजबी सईद बागवान यांच्यासह १० नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधले. यातील नऊ नगरसेवक हे बोदवडमधील असून एक मुक्ताईनगरातला आहे. हे सर्व जण खडसे समर्थक होते हे सांगणे नकोच. याचमुळे आजचे पक्षांतर हे आमदार चंद्रकांत पाटलांना विलक्षण बळ देणारे ठरले असून एकनाथ खडसे यांना धक्का देणारे ठरले आहे. यातील दुसरा धक्का हा भाजपला बसला आहे. कारण नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक हे भाजपचे होते. यामुळे एकाच वेळी एकनाथराव खडसे आणि भाजप यांना धक्का देण्याचे काम आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मुक्ताईनगर प्रमाणेच बोदवड येथेही पक्षांतर होणार असल्याचे सूतोवाच आमदार चंद्रकांत पाटील यांनी आधीच केले होते. www.livetrends.news यानुसार आज पक्षांतर झाल्याची बाब लक्षणीय आहे. याहून लक्षणीय बाब म्हणजे एकनाथराव खडसे यांचा प्रमुख पाठीराखा असणार्‍या अल्पसंख्यांक समाजालाही आमदार पाटलांनी आपल्या सोबत केले आहे. खडसे यांनी जाणीवपूर्वक बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये मुस्लीम समाजाच्या महिला नगराध्यक्षांना थेट जनतेतून निवडून आणण्याची किमया केली होती. अर्थात, तेव्हा त्यांचे मंत्रीपद नुकतेच गेले असले तरी आमदारकी होती. आणि विशेष म्हणजे राजकीय ताकद देखील होती. मात्र आता याच लोकप्रतिनिधींनी आमदार पाटील यांची सोबत केल्याचा स्पष्ट अर्थ हा एकनाथराव खडसे यांनी आपल्या हक्काच्या समाजातील समर्थक गमावले असा आहे. याचा सरळ परिणाम हा येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत होणार आहे.

एकीकडे मुक्ताईनगर आणि बोदवड नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकला असला तरी सावद्यात मात्र थोडी विचीत्र स्थिती आहे. www.livetrends.news येथील नगराध्यक्षा आणि भाजपचे बहुतांश नगरसेवक हे एकनाथराव खडसे यांच्या सोबत आहेत. ते तांत्रीकदृष्टीने भाजपात असले तरी अलीकडेच नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याची बाब विसरता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार केला असता, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील बोदवड आणि मुक्ताईनगर नगरपालिका कब्जात घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकाच वेळी खडसे आणि महाजन यांना धक्का दिला आहेच, पण यातून त्यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचेही दिसून येत आहे. आता या दोन्ही ठिकाणी एकनाथराव खडसे यांना पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागेल. ही तयारी मुक्ताईनगर मतदारसंघापुरतीच मर्यादीत नाही. तर, रक्षा खडसे यांच्या रूपाने आगामी लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघात नव्याने पुनर्बांधणी करावी लागणार आहे.

आधीचे मुक्ताईनगरातले आणि आजचे बोदवड येथील सत्तांतर हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुरब्बी व बेरजेच्या राजकारणाचे फलीत मानावे लागणार आहे. www.livetrends.news तर, दुसरीकडे एकनाथराव खडसे यांची राजकीय ताकद क्षीण झाल्याचे पाहून मतदारसंघातील त्यांचे कट्टर समर्थक देखील आता प्रॅक्टीकल विचार करत असल्याचेही आता दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा सरळ इशारा हा खडसे कुटुंबियांच्या आगामी राजकीय वाटचालीत खाचखळगे असतील हे स्पष्ट करणारा आहे.

Protected Content