गुटखा पकडताच आ. एकनाथराव खडसे पोलीस स्टेशनमध्ये !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगरात आज गुटख्याने भरलेला ट्रक जप्त केल्यानंतर आमदार एकनाथराव खडसे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मुक्ताईनगर तालुक्याला लागून मध्यप्रदेशची सीमा असून तेथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि अंमली पदार्थ हे इकडे येत असल्याचा आरोप आधीपासूनच करण्यात येत आहे. पोलिसांनी यावर अनेकदा कारवाई केली असली तरी देखील हा धंदा दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर काही तासांमध्येच कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने २५ लाख रूपयांचा चोरीचा गुटखा जप्त केला होता. या पाठोपाठ आज पुन्हा एकदा मुक्ताईनगर शहरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे गुटखा भरलेला असून याचे मूल्य हे खूप मोठे असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

दरम्यान, गुटख्याने भरलेला ट्रक हा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पकडून पोलीस स्थानकात आणल्यानंतर काही वेळातच आमदार एकनाथराव खडसे यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी गुटख्याच्या संदर्भात सुरू असलेल्या कारवाईची माहिती जाणून घेतली. यासोबत त्यांनी पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून याबाबत संबंधीतांवर कठोर कारवाईची मागणी केली.

Protected Content