मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या सभागृहात राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा नसतांना एकनाथ खडसे यांची प्रतिमा लावण्यात आल्यावरून सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर पालिकेची सभा मंगळवारी पार पडली. याप्रसंगी पालिकेच्या सभागृहात महापुरूषांच्या प्रतिमा न लावण्यात आल्याचा मुद्दा चर्चेमध्ये आला. याप्रसंगी भाजपचे स्वीकृत नगरसेवक ललित महाजन यांनी सभागृहात इतर प्रतिमांसह देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र का लावले नाही? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रभारी नगराध्यक्षा मनीषा पाटील व मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी शासन परिपत्रक व ठराव पहावे लागतील, असे उत्तरे दिले. यानंतर शिवसेना गटनेते राजेंद्र हिवराळे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे छायाचित्र कोणते शासकीय परिपत्रक व ठरावानुसार लावले? अशी विचारणा करून त्यांना धारेवर धरले.
यावरून गदारोळ निर्माण होत असतांना बांधकाम सभापती संतोष मराठे यांनी देखील या प्रकरणी प्रशासनाला विचारणा केली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणे व जयंती पूजन करणेबाबत शासनाचे परिपत्रक असून देखील याबाबत कार्यवाही का करण्यात आलेली नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकारी गायकवाड यांनी दिले.