‘त्या’ पदाधिकार्‍यांना श्रेष्ठींनी समज द्यावी : डॉ. जगदीश पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी सत्यजीत तांबे यांचे काम केल्याच्या मुद्यावरून आघाडीत बिघाडी झाली असतांना कॉंग्रेसचे नेते तथा ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील यांनी या वादात उडी घेतली आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी अनेक उमेदवार असले तरी प्रामुख्याने अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महविकास आघाडी समर्थीत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत झाली. आज सकाळपासून मतदान सुरू झाल्यानंतर सत्यजीत तांबे यांच्या टेंटमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचे दिसून आले. यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील हे देखील बराच वेळ येथे उभे राहून मतदारांना आवाहन करत असल्याचे सर्वांनी पाहिले. दरम्यान, यू. डी. पाटील यांचा फोटा सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. आम्ही लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून हे वृत्त प्रसिध्द केले होते.

या संदर्भात यू. डी. पाटील आमच्या सोबत वार्तालाप साधतांना म्हणाले की, मी सत्यजीत तांबे यांना पाठींबा दिलेला नसून तंबूत सहज उभे होतो. याचा कोणताही राजकीय हेतू नाही. तर कॉंग्रेस नेते तथा ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजसोबत बोलतांना या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठींबा दिला असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनीही त्यांचे काम करणे अपेक्षित होते. तथापि, पदाधिकार्‍यांनी तांबे यांचे काम केल्याची बाब दुर्दैवी आहे. आमचा देखील डॉ. तांबे यांच्याशी संबंध असले तरी आम्ही आघाडीधर्म पाळला. तथापि, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी याला हरताळ फासल्याने त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या पदाधिकार्‍यांना समज द्यावी अशी अपेक्षा डॉ. जगदीश पाटील यांनी व्यक्त केली.

Protected Content