कोरोनामुक्तांसाठी उपजिल्हा रूग्णालयात स्वतंत्र सुविधा

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोनातून मुक्त झालेल्या रूग्णांसाठी उपजिल्हा रूग्णालयात स्वतंत्र तपासणी सुुविधा उपलब्ध करावी असे निर्देश आ. चंद्रकांत पाटील यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोविडची रूग्णसंख्या बर्‍यापैकी आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. तथापि, संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान मुलांना तसेच नागरिकांना जास्त धोका असल्याने तिच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने औषधी, यंत्रसामग्री व इतर साहित्याची उपलब्धता तसेच अपूर्ण सुविधांबाबत तत्काळ अवगत करावे. तसेच कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांच्या नियमित तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी विभाग (ओपीडी कक्ष) सुरू करावा, अशा लेखी सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांना दिल्या.

या संदर्भातल्या पत्रात आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीत विषाणूच्या संसर्गातून बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर तपासण्या होत नाही. त्यातून म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. इतरही आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका दिसून येत आहे. यासाठी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची नियमित तपासणी झाल्यास म्युकरमायकोसिस व इतर आजारांपासून त्यांचा बचाव होईल. यासाठी ओपीडी कक्ष उभारण्याची सूचना आ. चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी व रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात लागणार्‍या औषधी, यंत्र सामुग्री, मुबलक साहित्य तसेच अपूर्ण असलेल्या सुविधांबाबत वेळेपूर्वी अवगत करावे. जेणेकरून शासन दरबारी मला त्यासाठी पाठपुरावा करणे सोपे होईल.

Protected Content