मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ एलसीबीच्या पथकाने गुटख्याची तस्करी करणार्या दोघांना अटक करत २१ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत वृत्त असे की, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुटख्याची तस्करीची माहिती मिळाली. यानुसार एलसीबीच्या पथकाने अंतुर्ली फाट्यावर १९ फेब्रुवारीला रात्री सापळा रचला. रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास इच्छापूरकडून मुक्ताईनगरकडे येणारी संशयित बोलेरो पिकअप गाडी (एमएच.२८-बीबी.०७५७) अंतुर्ली फाट्याजवळ (ता.मुक्ताईनगर) आली. या गाडीच्या तपासणीत गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या पुड्या गोणपाटामध्ये आढळल्या. गाडीसोबत असलेले गोविंदा विश्वनाथ राऊत व गोविंदा सुभाष आखरे (दोघे रा.टुणकी, ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा) यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. गाडीतून जप्त केलेल्या विमल गुटख्याची एकुण किंमत १६ लाख २२ हजार ७२० रुपये आहे. या कारवाईत ५ लाख रुपये किंमतीची गाडी देखील जप्त करण्यात आली.
अलीकडेच र्की फाट्याजवळ मुक्ताईनगर येथील दोघांना ४ लाखांचा गुटखा व ओम्नी गाडीसह अटक करण्यात आली होती. यामुळे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करणारे मोठे रॅकेट असल्याची शक्यता आता बळावली असून पोलिसांनी या दिशेने तपास करण्याची आवश्यकता आहे.