बँकेचे आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; शाखा बंद

जळगाव प्रतिनिधी । नेहरू चौकातील आयडीबीआयच्या शाखेतील आठ कर्मचारी कोरोना बाधीत आढळल्यामुळे ही शाखा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, नेहरू चौकात असलेल्या आयडीबीआय बँक शाखेत आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शनिवारी बँकेचे व्यवहार बंद ठेवून कार्यालय सील करण्यात आले. कोरोना संसर्गजन्य स्थितीने बँक बंद ठेवावे लागत असल्याचे सूचना फलक बँकेच्या बोर्डावर लावण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा मेहरूण शाखेतून करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, संबंधीत कर्मचार्‍यांना सोमवारी कोरोनासदृश लक्षणे जाणवत होती. यामुळे बँकेतच सर्व कर्मचार्‍यांच्या अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. यात चार कर्मचारी पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. यानंतर काही कर्मचार्‍यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली, यातही चार पॉझिटिव्ह आल्याने शनिवारी बँक बंद करण्यात आली आहे.

याबाबत बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील यांनी म्हटले आहे की, संसर्ग वाढू नये म्हणून बँकेचे काम थांबवले. माहिती फलकावर तशी सूचना लावली. आठ कर्मचारी होम क्वारंटाइन आहेत. सोमवारी बँक सुरू ठेवण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय होईल. शाखा सुरू राहिल्यास दुसर्‍या शाखेतील कर्मचारी नियुक्त केले जातील. तसेच बँकेचे निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली आहे.

Protected Content