मुंबई प्रतिनिधी । जगभरातील उद्योजकांना मंदी आणि भांडवली बाजारातील अनिश्चिततेने हैराण केले असतानाच रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी अपवाद ठरले आहेत. अंबानी यांच्या संपत्तीत मागील वर्षभरात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १ लाख १९ हजार कोटींची वाढ झाली आहे. अंबानी यांच्या संपत्ती वाढीत रिलायन्सच्या शेअरने सिंहाचा वाट उचलला आहे.
एकीकडे अंबानी यांची संपत्ती वाढत असताना अॅमेझॉनचे बॉस जेफ बेझॉस यांच्या संपत्तीत १३.२ अब्ज डॉलरची घट झाली. बेझॉस यांनी वर्षभरात ९२ हजार ४०० कोटी गमावले. जागतिक पातळीवर अतिश्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मॉ यांच्या संपत्तीत ११.३ अब्ज डॉलरची (७९ हजार १०० कोटी) वाढ झाली आहे. तेल आणि वायू क्षेत्रातील दबदबा असलेल्या अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने दूरसंचार, किरकोळ व्यापाराकडे मोर्चा वळवला आहे. मागील दोन वर्षात ‘रिलायन जिओ’ने दूरसंचार सेवेत मोठी मुसंडी मारली आहे. वर्षभरात रिलायन्सच्या शेअरमधील वृद्धी ही शेअर निर्देशांकांच्या तुलनेत सरस ठरली आहे. गुंतवणूकदार रिलायन्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.