गोंडगाव अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ बजरंग चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मुक मोर्चा

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करा या मागणीसाठी धरणगाव शहरातील सर्वपक्षिय मुक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बजरंग चौक, मराठे गल्ली ते धरणगाव तहसील कार्यालयासमोर काढण्यात आला. यावेळी धरणगाव तालुका प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षीय चिमुकलीवर गावात राहणारा स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) याने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर दगडाने मारून तिला कडबा कुट्टीत झाकुन ठेवले हा प्रकार उघडकीला आल्यानंतर संशयित आरोपी स्वप्निल पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली  होती. दरम्यान, संशयितावर जलद गतीने न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा करावी, पिडीत कुटुंबाला शासनाकडून न्याय देण्यात यावा या मागणीसाठी धरणगाव शहरात मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील विविध संघटना, सर्वपक्षिय नेते, शाळेतील विद्यार्थीनी, विद्यार्थी यांच्यासह महिला व पुरूषांची मोठ्या संख्येने गर्दी होती. हा मुक मोर्चा बजरंग चौक येथून सुरूवात करण्‍यात आला. त्यानंतर मराठे गल्ली, धरणी चौक, कोट बाजार, तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या मुकमोर्चात सहभाग नोंदविला होता. अटकेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अश्या मागणीचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले.

Protected Content