वाळू माफियांची मुजोरी; तलाठ्यासह चालकाला धक्काबुक्की

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळूमाफियाच्या ट्रकवर कारवाई केल्याचा राग आल्याने वाळूमाफियाने पोलिस क्रिडा समारोपात तहसीलदाराच्या वाहन चालकाला धमकी दिली होती. त्यानंतर पेट्रोलिंगवर असलेल्या तलाठ्यासह वाहन चालकाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास निमखेडी शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात पद्माकर नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव या वाळूमाफियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महाबळ परिसरातील मनोज विक्रम कोळी हे तहसीलदार यांच्या वाहनावर चालक म्हणून नियुक्त आहेत. अवैध वाळू उपसावर आळा घालण्यासाठी ते भोलाणे येथील तलाठी मनोहर बाविस्कर, ममुराबाद तलाठी विरेंद्र पालवे व पोलीस कर्मचारी समाधान पाटील यांच्यासोबत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शासकीय वाहनाने निमखेडी शिवारात गस्त घालीत होते. पेट्रोलिंग करीत असतांना निमखेडी गावातून शहराकडे येत असतांना पद्माकर नन्नवरे याने पथकाचे वाहन थांबवले. त्यानंतर चालक मनोज कोळी यांच्याजवळ येवून त्यांना शिवीगाळ करु लागला. तसेच तुझ्यामुळे माझा वाळू वाहतुकीचा मालट्रक पकडला गेला असे म्हणत त्याने कोळी यांना धक्काबुक्की केली. तसेच तुझी नोकरी खावून जाईल अशी धमकी देखील त्याने दिले.

हा वाद सुरु असतांना पथकातील तलाठी मनोहर बाविस्कर, विरेंद्र पालवे व समाधान पाटील यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मनोहर बाविस्कर यांना देखील धक्काबुक्की करीत तो दुचाकीने तेथून पसार झाला. याप्रकरणी मनोज कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पद्माकर नन्नवरे रा. बांभोरी याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content